शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व संघटना एकत्र या – बच्चू कडूंचं शेतकरी हक्क परिषदेत आवाहन
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे दि ९ ऑगस्ट (प्रतीनीधी) :- कर्जमाफी हा विषय एका संघटनेचा, जातीचा किंवा धर्माचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, कर्जमाफीच्या लढ्यासाठी सर्व संघटनांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणं अत्यावश्यक आहे, असं ठाम आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार मा. बच्चूभाऊ कडू यांनी केलं आहे.
पुण्यात आयोजित शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंनी भावनिक भाषण करत शेतकऱ्यांची चळवळ संपवू नये, कारण चळवळ संपली तर शेतकऱ्यांचा वाली कोणी राहणार नाही, असं स्पष्ट सांगितलं.
या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी नेते अजित नवले, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
बच्चू कडूंनी भाषणात पुढे म्हटलं की –
"धर्म आणि जातीच्या प्रश्नावर कधीच दोन गट तयार होत नाहीत, पण शेतकरी प्रश्नावर मात्र गट-तट निर्माण होतात. ही परिस्थिती बदलावी लागेल. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी समान कार्यक्रम आखून सर्वांनी एकत्र यावं, अन्यथा शेतकऱ्यांचा आवाज कुणी ऐकणार नाही."
शेतकरी हक्क परिषदेतील या आवाहनानंतर उपस्थित नेत्यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याची तयारी दर्शवली.
🌾 शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येण्याचं हे आवाहन पुढील लढ्याला नवी दिशा देईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.