शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री–रोहित पवार चर्चा; ‘कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही’
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि १ जुलै :- शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि आमदार Rohit Pawar यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बैठकीत सध्याच्या कर्जमाफीतील अटीशर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे आकडेवारीसह मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा, प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग दोन वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट तसेच आवश्यक ट्रिगरसह १ रुपयांत पीकविमा योजना या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री यांनी पुढील आठवड्यात परदेशी समितीसोबत या मुद्द्यांवर चर्चा करून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले. या बैठकीतून सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदिप क्षीरसागर, आ. कैलास पाटील, आ. राजू खरे, आ. अभिजित पाटील, डॉ. अनिकेत देशमुख हेही उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या चर्चेतून आता नेमका काय निर्णय होणार, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे!