शाही विवाह सोहळ्याला फाटा! अतुल सावे कुटुंबाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; विवाहाच्या खर्चातून १ कोटींचा मदतनिधी समर्पित!
मुलगा अनुराग आणि ईशाचा विवाह २५ नोव्हेंबरला घरगुती व साध्या पद्धतीने होणार; सावे-मुळे परिवाराचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि ४ :- मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले असून शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत विवाह सोहळ्यावर मोठा खर्च करणे योग्य ठरणार नाही, असा संवेदनशील निर्णय घेत मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबाने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. मुलगा चि. अनुराग याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात न करता घरगुती स्वरूपात साधेपणाने करण्याचा निर्णय सावे आणि मुळे परिवाराने घेतला आहे. विशेष म्हणजे, विवाह सोहळ्यासाठी नियोजित खर्चात उद्योग क्षेत्रातील निधीची भर घालून शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला आहे.
मंत्री अतुल सावे यांचे धाकटे सुपुत्र उद्योजक चि. अनुराग यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित उद्योजक श्री. अजित मुळे यांची कन्या चि.सौ.कां. ईशा हिच्याशी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही परिवारांच्या नातलग, मित्रपरिवार आणि उद्योग क्षेत्रातील हजारो मान्यवरांना आमंत्रित करण्याचे नियोजन होते. मात्र, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा लक्षात घेता दोन्ही कुटुंबांनी मोठा सोहळा टाळण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव संकटात असताना विवाहाचा भव्य सोहळा साजरा करणे संयुक्तिक वाटले नाही. त्यामुळे विवाह घरगुती स्वरूपात आणि साधेपणाने करण्याचे निश्चित करण्यात आले. विवाहावर होणाऱ्या खर्चातील निधी तसेच उद्योग क्षेत्रातील योगदानाची भर घालून एक कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वर्गीय मोरेश्वर सावे साहेब यांच्यापासून सावे परिवार सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रात योगदान देत आला आहे. मुळे परिवाराचाही उद्योग क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे. दोन्ही परिवारांमध्ये सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. या प्रयत्नांना आपलाही हातभार लागावा, या भावनेतून हा एक कोटी रुपयांचा निधी समर्पित करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
विवाहातील थाटापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य!
दुष्काळाच्या कठीण काळात विवाह सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळून शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा सावे-मुळे परिवाराचा निर्णय निश्चितच सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा आहे. अनुराग आणि ईशा यांच्या नव्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात शेतकरी बांधवांच्या आशीर्वादाने व्हावी, हीच या परिवाराची भावना आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित