शाळेच्या पहिल्याच दिवशी 1.40 लाख विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके; मनपाचे नियोजन पूर्णत्वाकडे
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- शहरातील एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठे नियोजन केले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 40 हजार 299 विद्यार्थ्यांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्धार केला आहे.
या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सिडको एन-1 येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये उभारलेल्या पाठ्यपुस्तक साठवणूक व वितरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी वितरण प्रक्रियेची पाहणी करत सर्व शाळांना वेळेत पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेने फेब्रुवारी 2026 मध्येच मागणी नोंदवून दूरदृष्टी दाखवली होती. शहरातील 513 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 8 लाख 39 हजार 52 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती.
आतापर्यंत 6 लाख 60 हजार 10 पुस्तके प्राप्त झाली असून हे प्रमाण सुमारे 79 टक्के आहे. उर्वरित पुस्तकांचा पुरवठा लवकरच पूर्ण होणार असून 8 ते 12 जूनदरम्यान केंद्रनिहाय शाळांना वितरण केले जाणार आहे.
महानगरपालिकेच्या नियोजनानुसार 15 जून रोजी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके पोहोचणार आहेत. यासाठी विशेष वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.
यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सुधारित अभ्यासक्रमाची पुस्तकेही महानगरपालिकेकडे उपलब्ध झाली असून वितरणासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शहरातील 344 मराठी, 158 उर्दू, 5 हिंदी आणि 6 इंग्रजी माध्यमांच्या एकूण 513 शाळांपर्यंत पुस्तके सुरक्षित व वेळेत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहराच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी!