शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी झेप; अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या सुविधांतून देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी झेप; अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शहरातील क्रीडा क्षेत्राला नवी झेप; अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- शहरातील विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (१ नोव्हेंबर) करण्यात आले. नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पांतर्गत ४०० मीटरचा आठ लेनचा सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान, फ्लड लाईट्स आणि खेळाडूंच्या निवासासाठी युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सुंदर सिंथेटिक ट्रॅक आणि प्रकाशव्यवस्थेमुळे खेळाडूंना सरावासाठी चांगले वातावरण मिळणार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन एखादा खेळाडू भविष्यात भारतासाठी पदक मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कामासाठी योगदान देणाऱ्या क्रीडा विभागाचे आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे त्यांनी अभिनंदन केले.

१२ कोटी ७५ लाखांत सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदान

सुमारे १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेनची सुविधा उपलब्ध आहे. धावणे, अडथळा शर्यत, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आणि भालाफेक अशा विविध क्रीडाप्रकारांचा सराव व स्पर्धा येथे घेता येणार आहेत. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

रात्रीही सरावाची सुविधा; ८८ दिव्यांनी मैदान उजळणार

दहा हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर प्रत्येकी २२ दिवे बसविण्यात आले असून एकूण ८८ दिव्यांची प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. फ्लड लाईट्समुळे सायंकाळी आणि रात्रीही सराव तसेच स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे.

खेळाडूंसाठी १६ खोल्यांचे युवा वसतिगृह

खेळाडूंच्या निवासाची अडचण दूर करण्यासाठी चार कोटी रुपयांच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. यामध्ये १६ खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय आणि वाचन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिली धावपटूंना प्रोत्साहनाची थाप

लोकार्पणानंतर नव्या सिंथेटिक ट्रॅकवर मुली आणि मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या प्रदर्शनी स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लॅप देऊन स्पर्धांना सुरुवात केली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यात सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली.

या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण आणि निवासाची सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठीही विभागीय क्रीडा संकुल सज्ज झाले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित