वाळूजगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीची चौकशी करा; शिवसेना वाहतूक सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप; बदली व सखोल चौकशीची मागणी

वाळूजगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीची चौकशी करा; शिवसेना वाहतूक सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १७ :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) यांच्या वतीने वाळूजगाव पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराबाबत पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, वाळूजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले काही कर्मचारी अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी बदली झालेल्या एका कर्मचाऱ्याची पुन्हा वाळूजगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती कशी झाली, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांच्या कथित अरेरावीच्या भाषेमुळे आणि मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खांमगांवकर, शहराध्यक्ष युसूफ शाह, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे, तबिब हबीबभाई आणि शहर सचिव सय्यद अली यांच्या स्वाक्षरीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

टीप : या बातमीत नमूद करण्यात आलेले आरोप हे निवेदनातील दाव्यांवर आधारित असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.