“वनहक्क दावे प्रलंबित ठेवून शेतकऱ्यांची उपजीविका हिरावली; दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा – संतोष पारखी यांची मागणी”

“वनहक्क दावे प्रलंबित ठेवून शेतकऱ्यांची उपजीविका हिरावली; दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा – संतोष पारखी यांची मागणी”

महाराष्ट्र वाणी न्युज 

चंद्रपूर (प्रतीनीधी) दि १८ :- अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींचे प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ निकाली काढून वन प्रमाणपत्र वाटप करावे, तसेच बळजबरीने जमिनी हिसकावून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी केली.

यासंदर्भात त्यांनी मुख्य वनसंरक्षक मणिकंडा रामानुजम यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेना उपमहानगरप्रमुख विश्वास खैरे उपस्थित होते.

संतोष पारखी यांनी सांगितले की, वनहक्क कायदा २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ नुसार अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींना शेती, निस्तार, गौण वनोत्पादन, चराई, मासेमारी यांसह विविध हक्क प्राप्त आहेत. तरीदेखील प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी केलेली नाही. उलट, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर जेसिबीद्वारे मोठे खड्डे पाडून तारेचे कंपाऊंड उभारले आणि फळझाडे लावून शेतकऱ्यांना पिक घेण्यास मज्जाव केला. परिणामी, अनेक वनभूमीधारक उपासमारीच्या संकटात सापडले आहेत.

पुढे बोलताना पारखी म्हणाले की, वनहक्क दावे निकाली काढून प्रमाणपत्र वाटप करणे, मंजूर जमिनीची मोजणी करून ७/१२ उतारे देणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य असून, तरीही तीन वर्षांपासून प्रकरणे रखडवून ठेवली आहेत. 13 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दावे निकाली येईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष करून वन विभागाने बळजबरीने कारवाई केली आहे.

तसेच, जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवे निर्णय होत नाहीत, आणि त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत.

या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून संतोष पारखी यांनी मागणी केली की,

प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ निकाली काढावेत,

शेतकऱ्यांना ७/१२ उतारे वाटप करून उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे,

जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी,

पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.

अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांसोबत मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असा इशारा पारखी यांनी निवेदनातून दिला.

👉 “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रान उठवण्याची वेळ आल्यास शिवसेना मागे हटणार नाही!” 🚩