वक्फ निधीवर सरकारी यंत्रणेचा भार?; समाजवादी पार्टीचा संताप, वक्फ मंडळाला २४ तासांचा इशारा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), २५ :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्ती करून त्यांचे वेतन मात्र वक्फ निधीतूनच दिले जात असल्याचा गंभीर मुद्दा समाजवादी पार्टीने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाच्या शिष्टमंडळाने वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांची भेट घेऊन २४ तासांत संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ सेवेत परत बोलावण्याची मागणी केली.
हज हाऊसमध्ये झालेल्या वक्फ मंडळाच्या बैठकीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. रियाज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या निवेदनात वक्फ निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, वक्फ मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हे शासनाकडून नव्हे तर राज्यातील मशिदी, दर्गे, कब्रस्ताने आणि इतर वक्फ संस्थांकडून जमा होणाऱ्या निधीतून दिले जाते. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांचा वापर हज हाऊस, अल्पसंख्यांक आयुक्तालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये करणे योग्य नसल्याचा दावा करण्यात आला.
मनुष्यबळाचा तुटवडा, तरीही प्रतिनियुक्तीवर अधिकारी
राज्यातील वक्फ मालमत्तांचे संरक्षण, अतिक्रमणविरोधी मोहिमा, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासनिक कामांवर आधीच मनुष्यबळाच्या कमतरतेचा परिणाम होत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. अशा परिस्थितीत उपलब्ध कर्मचारी बाहेर पाठविण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
समाजवादी पार्टीने शासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शासकीय कार्यालयांसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्ती करण्याऐवजी वक्फ संस्थांवरील आर्थिक भार वाढवला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, अध्यक्ष समीर काझी यांनी या निवेदनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज अहमद खान यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाजवादी पार्टीने स्पष्ट इशारा देत सांगितले की, २४ तासांच्या आत मागणीवर निर्णय न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.
वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – बातमीचा वेग, सत्याचा आवाज!