लाडकी बहीण योजनेला दोन वर्षे पूर्ण; ७० हजार कोटींचा खर्च, ८१ लाख लाभार्थी अपात्र!
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २९ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीत सरकारने या योजनेवर तब्बल ७० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या सुमारे १ कोटी ६६ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. तर पडताळणीत टप्प्याटप्प्याने तब्बल ८१ लाख लाभार्थी अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना चर्चेत आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशातील धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्याची घोषणा केली. २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची तरतूद करण्यात आली. सुरुवातीला या योजनेसाठी सुमारे २ कोटी ५३ लाख अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ मंजूर करण्यात आला.
मात्र नंतरच्या पडताळणीत अनेक अनियमितता समोर आल्या. जास्त उत्पन्न, आयकर भरणारे कुटुंब, सरकारी नोकरी, पेन्शनधारक सदस्य, चारचाकी वाहन मालकी तसेच अपूर्ण ई-केवायसी कागदपत्रांमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरले. विशेष म्हणजे, सुमारे १४ हजार पुरुषांनी महिलांच्या नावावर लाभ घेतल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
माहितीनुसार, अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे १० लाख लाभार्थी महिलाही आढळल्या आहेत, तर पाच लाख कुटुंबांमध्ये सरकारी नोकरी असतानाही लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
या योजनेवर जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीत सुमारे ४३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात २८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी गरजेनुसार पुरवणी मागण्यांद्वारे निधी वाढवला जात आहे. मात्र या संपूर्ण खर्चाबाबत सरकारने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.
वाचा, समजा आणि राज्यातील घडामोडींवर राहा अपडेट — महाराष्ट्र वाणीसोबत!