लग्न जुळविण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक! बनावट लग्न लावून तरुणाला गंडा; मुख्य आरोपी सुनील खेमकर जेरबंद

लग्न जुळविण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक! बनावट लग्न लावून तरुणाला गंडा; मुख्य आरोपी सुनील खेमकर जेरबंद
लग्न जुळविण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक! बनावट लग्न लावून तरुणाला गंडा; मुख्य आरोपी सुनील खेमकर जेरबंद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- लग्नासाठी मुलगी दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्न जुळविण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाख रुपये उकळले आणि बनावट लग्न लावून तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी सुनील खेमकर याला अहिल्यानगर येथील धनगर वस्तीतून पळून जात असताना पकडले आहे.

असा रचला फसवणुकीचा डाव!

या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण कन्नू गोळे (वय ३०, रा. वारसवाडा, ता. अंबड, जि. जालना) यांना आरोपींनी लग्नासाठी मुलगी दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडून लग्नासाठी एकूण पाच लाख रुपये घेतले. आरोपी क्रमांक दोन कोमल राजू पवार हिच्याशी फिर्यादीचे लग्न लावून दिले. मात्र, हे लग्न बनावट असल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

बेगमपुरा पोलिसांची तत्काळ कारवाई

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ३(५) प्रमाणे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.१९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला गती दिली. आरोपी सुनील विठोबा खेमकर याचा शोध घेऊन त्याला अहिल्यानगर येथील धनगर वस्तीतून पळून जात असताना पकडण्यात आले.

इतर आरोपींचाही शोध सुरू

या गुन्ह्यात सुनील विठोबा खेमकर, कोमल राजू पवार, सचिन जाधव (रा. वानखेडेनगर, छत्रपती संभाजीनगर), कांता राहाणे व इतर आरोपींचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिका आणि फसवणुकीचे नेमके स्वरूप याबाबत पुढील तपास सुरू आहे.

लग्न जुळविण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक झाल्याच्या या घटनेमुळे विवाहाच्या आमिषाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.