रोहित पठारे हत्या प्रकरणी आरोपींना फाशी द्या; कुटुंबाला २ कोटींची आर्थिक मदत करा
भारतीय दलित पँथरची विभागीय आयुक्तांकडे मागणी; कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी, घर आणि पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- वैजापूर येथील रोहित पठारे या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांनी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.
या निवेदनात रोहित पठारे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच रोहितच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि वैजापूर शहर परिसरात कुटुंबाला घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपींच्या कुटुंबीयांकडून रोहितच्या कुटुंबाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, असेही संघटनेने म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा
रोहित पठारे प्रकरणात प्रशासनाकडून तातडीने कारवाई झाली नाही, तर भारतीय दलित पँथरच्या वतीने विविध समाजबांधवांना सोबत घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर लक्ष्मण भुतकर यांच्यासह प्रा. प्रकाश सोनवणे, धम्मपाल दांडगे, ॲड. सिद्धार्थ गवई, दशरथ कांबळे, ॲड. सतीश राऊत, समाधान कस्तुरे, सुप्रिया बनसोडे, अहमद पठाण, शेरिफे लाला, गौतम पगारे, उत्तम डोंगरे आणि जगदेव जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित