रोहित पठारे हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आरोपींच्या तातडीच्या अटकेसाठी अमित भुईगळ यांची पोलिसांकडे मागणी!
पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन; कठोर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला निवेदन, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार.
वैजापूर दि ६ :- रोहित पठारे यांच्या हत्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे राज्यस्तरीय नेते तथा नगरसेवक अमितभाऊ भुईगळ यांनी वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत हत्येचा निषेध नोंदवला.
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमितभाऊ भुईगळ यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील संबंधित आरोपींना विलंब न करता अटक करावी, तसेच तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे पीडित कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळून कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही. या कठीण प्रसंगी पक्ष पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा असून न्यायासाठी संघर्ष सुरूच ठेवणार आहे, अशी ठाम भूमिका अमितभाऊ भुईगळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित