राज्य वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी ढोरेगावच्या पाच खेळाडूंची निवड; नागपूरमध्ये जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व!

सांडा फाईट आणि लाठी-काठी प्रकारात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत २ सुवर्ण व ८ रौप्य पदकांची कमाई

राज्य वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी ढोरेगावच्या पाच खेळाडूंची निवड; नागपूरमध्ये जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व!

ढोरेगाव दि १७ :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर मजल मारू शकते, हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून सिद्ध केले आहे. नागपूर येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सब-ज्युनिअर व सीनियर राज्य वुशू (सांडा व लाठी-काठी) अजिंक्यपद स्पर्धेसाठी ढोरेगावच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सुमेरा शब्बीर शेख, अनुज सागर खाजेकर आणि साद शब्बीर शेख यांची सांडा फाईट प्रकारात, तर आदित्य किशोर उमाप आणि फरहीन नय्युम शेख यांची लाठी-काठी प्रकारात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ढोरेगावचे क्रीडा निदेशक अली बाकोदा सांभाळणार आहेत.

जिल्हास्तरीय स्पर्धेत २ सुवर्ण, ८ रौप्य पदकांची कमाई

छत्रपती संभाजीनगर जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सब-ज्युनिअर व सीनियर जिल्हास्तरीय स्पर्धा व निवड चाचणीत ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.

सांडा फाईट प्रकारात सुमेरा शब्बीर शेख, अनुज सागर खाजेकर, साद शब्बीर शेख, सोमनाथ जाधव, प्रणव सतीश आव्हाड, जोसेफ बबलू आणि राहील आलिम शेख यांनी, तर लाठी-काठी प्रकारात आदित्य किशोर उमाप, फरहीन नय्युम शेख आणि फरहान नय्युम शेख यांनी आपले कौशल्य दाखवले. या खेळाडूंनी एकूण २ सुवर्ण आणि ८ रौप्य पदकांची कमाई करत शाळेचा नावलौकिक वाढवला. याच कामगिरीच्या जोरावर पाच विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

ग्रामीण भागातील गुणवत्तेचा राज्यस्तरावर ठसा!

शहरातील नामांकित क्रीडा अकॅडमींच्या खेळाडूंशी स्पर्धा करत ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम, नियमित सराव आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. तसेच क्रीडा शिक्षक अली बाकोदा, जिल्हा असोसिएशनचे सचिव महेश इंदापुरे, प्रशिक्षक मास्टर मुदस्सीर, बंटी राठोड आणि सुमीत खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, उपाध्यक्ष अशोक कांबळे व सर्व पदाधिकारी, सरपंच रजियाबी अयुब पटेल, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव, विजय दुतोंडे, विष्णू घुगे, केंद्रप्रमुख सचिन डमाळे, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, राजेश हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा आणि कल्याणी जगताप सातत्याने प्रयत्नशील आहेत.

ढोरेगावच्या मातीत घडलेले हे पाच खेळाडू आता नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या यशामुळे गावासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, राज्यस्तरावरही हे खेळाडू पदकांची कमाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित