“राज्यात राजकीय भूकंप! 22 आमदार अकस्मात पलटीमारणार — आदित्य ठाकरेचा स्फोटक दावा!”
महाराष्ट्र वाणी
नागपूर (प्रतीनीधी) दि ८ :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडू शकते, असा संकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना एका ‘नियमबाह्य’ झालेलेल्या पक्षातील दोन गटांपैकी तब्बल २२ आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “राज्यात गद्दारी करून उभा राहिलेल्या या पक्षाचे दोन गट झाले आहेत. यातील २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली आहेत आणि त्यांच्या संकेतावरच सगळं घडतं.”
मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या इशाऱ्यावरूनही त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. इंडिगो विमानप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.
सरकारवर चार्टर फ्लाइट व हेलिकॉप्टर वापराचा घणाघात
आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला.
“सरकारचे मंत्री चार्टर विमानाने फिरतात, स्थानिक निवडणुकांसाठी हेलिकॉप्टरने प्रचार करतात. विमान कंपन्यांचे व्यवस्थापन ढासळले आहे, देशभर प्रवासाची वाताहत झाली आहे. यावर गंभीर चर्चा करायला हवी असताना मुख्यमंत्री विषय टाळत फिरतात,” असा आरोप त्यांनी केला.
विकासाच्या नावाखाली विनाश – आदित्य ठाकरेची टीका
पर्यावरणाच्या प्रश्नावरही आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की—
नाशिक तपोवनातील शेकडो झाडे,
ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरातील ७०० झाडे,
नागपूरमधील आजनी वन,
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील वृक्षतोड,
ताडोबा, मेळघाट, सह्याद्री परिसरातील मायनिंग
या सर्व कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून “ही सरकार विकासाच्या नावावर पर्यावरणाचा विनाश करत आहे”, अशी टीका त्यांनी केली.
हिवाळी अधिवेशन गांभीर्याशिवाय – विरोधकांचा आरोप
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
“शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, शहरांची अवस्था बिकट झाली आहे, पण सरकार एकाही महत्वाच्या विषयावर चर्चा करत नाही. अधिवेशनाबाबत सरकारला गांभीर्यच नाही,” असे ते म्हणाले.
“निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेले सरकार”
विरोधी पक्षनेतेपद न देण्याबाबतही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
“राज्यात निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेले बहुमताचे सरकार आहे. हे सरकार विरोधकांशी चर्चा करण्यास घाबरते, म्हणूनच विरोधी पक्षनेतापद रोखून ठेवले आहे. सरकारला विरोधकांची भीती का वाटते?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करू शकतो. पुढील काही दिवसांत घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.