रस्त्यावर महिलांना व व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!किरतपूर–पुरणगाव परिसरात दहशत माजवणारे दोघे अटकेत; मोबाईल, मोटारसायकल, रोकड जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १९ :-
रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि फिरतीवर असणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या दोघा इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन, एक मोटारसायकल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या लुटमारीत सहभागी असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून वैजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १८/१०/२०२५ रोजी उत्तर प्रदेश येथील सुरेशसिंग माधवसिंग (वय ३६) हे कपडे विक्रीसाठी किरतपुर फाटा ते सुराळा या रस्त्याने जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल, रोख रक्कम व एचएफ डिलक्स मोटारसायकल हिसकावून नेली. तसेच प्रतिभा माणिकराव जगताप यांचा वन प्लस मोबाईलही पुरणगाव चौफुली येथे हिसकावण्यात आला. यावरून पोस्टे वैजापूर गुन्हा क्रमांक ५९८/२०२५ प्रमाणे कलम ३०९(४), ३(५) बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
सदर घटनेचा गंभीर स्वरूप लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनायक कुमार राठोड यांनी तात्काळ गुन्हेगारांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवन इंगळे यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर रोजी गंगापूर–वैजापूर परिसरात गस्तीदरम्यान दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी दिवाळीच्या दोन दिवस आधी पुरणगाव फाटा येथे एका महिलेकडून मोबाईल हिसकावल्याची व बाहेर राज्यातून आलेल्या व्यापाऱ्यावर चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
अटक आरोपींपैकी संदीप दादा काळे याच्यावर पोस्टे कोपरगाव गुन्हा क्रमांक २९७/२०२५ देखील दाखल असून तो त्या गुन्ह्यातून फरार असल्याचे आढळून आले आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनायक कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय पवन इंगळे, पोलीस कर्मचारी सुधीर मोटे, विष्णु गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे तसेच चालक संजय तांदळे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली.