"रस्त्याच्या मधोमध उभे विद्युत खांब; नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा!" – आमदार प्रदीप जैस्वाल यांचा इशारा

१५ कोटींच्या जटवाडा–हर्सूल रस्त्याची पाहणी; महावितरणला तातडीने खांब हटविण्याचे आदेश

"रस्त्याच्या मधोमध उभे विद्युत खांब; नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा!" – आमदार प्रदीप जैस्वाल यांचा इशारा
"रस्त्याच्या मधोमध उभे विद्युत खांब; नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा!" – आमदार प्रदीप जैस्वाल यांचा इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- मध्य विधानसभा मतदारसंघातील जटवाडा रस्ता–हर्सूल मध्यवर्ती कारागृह ते स्मृतीवन उद्यान या सुमारे १५ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, रस्त्याच्या मधोमध उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब वाहतुकीस गंभीर अडथळा ठरत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

रस्त्याचे काम सुरू असतानाही विद्युत खांब न हलवल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

पाहणीदरम्यान आमदार जैस्वाल यांनी महावितरण आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना रस्त्यातील सर्व अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारचा खेळ होऊ देणार नाही. सुरक्षित, दर्जेदार आणि अडथळामुक्त रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी प्रभाग क्रमांक १ चे माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे, प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते किशोर नागरे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, शिवसेना पदाधिकारी तसेच महावितरण आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच सर्व विद्युत खांब हटवून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनीही केली आहे.