“युती महाराष्ट्रात होईल, शहरापुरती नाही!” – इम्तियाज जलिलांचा ठाम इशारा; एमआयएम सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल

“युती महाराष्ट्रात होईल, शहरापुरती नाही!” – इम्तियाज जलिलांचा ठाम इशारा; एमआयएम सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १५ :- राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी युतीबाबत अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमची भक्कम ताकद असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांनी एमआयएमशी युतीची ऑफर दिली होती. मात्र, इम्तियाज जलिल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युती करायची असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रात होईल; केवळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेपुरती युती होणार नाही.

2015 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 25 नगरसेवक निवडून आले होते आणि पक्षाला विरोधी पक्षनेतेपदही मिळाले होते, याची आठवण करून देत जलिल म्हणाले की, ज्या प्रभागांमध्ये एमआयएमची ताकद आहे, तिथे युती झाल्यानंतर जागा मागितल्या जातील. यामुळे अंतर्गत वाद निर्माण होऊन त्याचे विपरीत परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात.

युती झाली नाही तरी एमआयएम स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास पूर्णपणे सक्षम असून, राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांनी एमआयएमला दिलेल्या पाठिंब्याचाच पुनरुच्चार महापालिका निवडणुकीत झाला, तर एमआयएम सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल आणि महापौरपदही एमआयएमच्याच वाट्याला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमआयएमच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, मतदार पुन्हा एकदा आशिर्वाद देतील, असा ठाम दावा इम्तियाज जलिल यांनी केला आहे.

— शहराच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी ही निवडणूक, एमआयएमचा दावा किती खरा ठरेल?