मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि २६ :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची कमतरता आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम याचा आढावा घेण्यात येत होता. पालकमंत्री तसेच प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये शासनाच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, जनावरे तसेच पिण्याच्या पाण्याशी संबंधित विविध उपाययोजनांचा समावेश आहे.

दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार?

1. जमीन महसुलात सवलत

दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

2. पीक कर्जाचे पुनर्गठन

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

3. कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती

शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला परिस्थितीनुसार स्थगिती देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

4. कृषीपंपाच्या वीजबिलात सवलत

दुष्काळग्रस्त भागातील कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलतीची तरतूद आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल माफीची योजना आधीच लागू असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.

5. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत

दुष्काळग्रस्त भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलत किंवा माफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

6. रोजगार हमीच्या कामांना चालना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियमांमध्ये आवश्यक शिथिलता देऊन अधिकाधिक रोजगाराची कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

7. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था

ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, तेथे आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

8. कृषीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याची उपाययोजना

टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही, अशी उपाययोजना करण्यात येणार आहे.

9. शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्य

शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना आवश्यकतेनुसार अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

10. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गरजेनुसार चारा छावण्यांबाबतही कार्यवाही केली जाणार आहे.

जलसंधारणाच्या कामांनाही प्राधान्य

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी यापूर्वी जारी केलेल्या आदेशांनुसार उपाययोजना सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान, दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची प्रत्यक्ष स्थिती नोंदवण्यासाठी छायाचित्रे आणि जीपीएस आधारित माहिती संकलित करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर आता संबंधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना प्रत्यक्ष मदत कधी आणि कशा स्वरूपात मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.