मिठाईच्या दुकानांवर FDA चा बडगा! छत्रपती संभाजीनगरमधील ४ मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित
कुणाला केवळ १४ टक्के गुण; अस्वच्छता, गंजलेली उपकरणे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 'Safe Food Safe Maharashtra' मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातील चार मिठाई उत्पादकांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान या प्रतिष्ठानांमध्ये अस्वच्छता, गंजलेली उपकरणे, अन्न व पाण्याच्या प्रयोगशाळा चाचण्यांचा अभाव आणि अन्न प्रक्रिया व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, काही प्रतिष्ठानांना तपासणीत अवघे १४ टक्के गुण मिळाले असून, मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
या चार मिठाई उत्पादकांवर कारवाई
१. मे. बालाजी बिकानेर मिठाईवाला – वडगाव कोल्हाटी
अयोध्यानगर परिसरातील या प्रतिष्ठानला तपासणीत केवळ ३५ टक्के गुण मिळाले. अपुरे वायुवीजन, गंजलेली उपकरणे, अन्नपदार्थांच्या चाचण्यांचा अभाव आणि स्वच्छता रसायनांच्या स्वतंत्र साठवणुकीची व्यवस्था नसल्याचे आढळले. त्यामुळे नोंदणी निलंबित करण्यात आली.
२. मे. मधुर मिलन एंटरप्रायझेस – एमआयडीसी रेल्वे स्टेशन
या प्रतिष्ठानची तपासणी केली असता केवळ १४ टक्के गुण मिळाले. तब्बल ३२ गंभीर त्रुटी आढळल्या. अनधिकृत पॅकिंग साहित्याचा वापर, पाण्याची अपुरी उपलब्धता आणि FIFO (First In, First Out) नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला.
३. मे. राजस्थानी बिकानेर प्रॉडक्ट – रेल्वे स्टेशन रोड
या प्रतिष्ठानलाही तपासणीत अवघे १४ टक्के गुण मिळाले. एकूण ३४ त्रुटी आढळून आल्या. गंजलेली उपकरणे, निसरडी फरशी, मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
४. मे. जगदंबा स्वीट्स – बजाजनगर, वडगाव कोल्हाटी
या प्रतिष्ठानला तपासणीत केवळ १९ टक्के गुण मिळाले. कीड नियंत्रणाची अपुरी व्यवस्था, स्वच्छतेचे वेळापत्रक नसणे, मोजमाप साधनांचे कॅलिब्रेशन न करणे आणि पुरवठा साखळीशी संबंधित निकषांचे उल्लंघन अशा एकूण ३० त्रुटी आढळल्या.
उत्पादन, विक्री आणि वितरण बंद करण्याचे आदेश
FDA ने या चारही प्रतिष्ठानांना निलंबनाच्या कालावधीत अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, विक्री आणि वितरण तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी सर्व त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधी अहवाल, छायाचित्रे आणि प्रयोगशाळा चाचण्यांचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
तसेच सक्षम अधिकाऱ्यांकडून फेरतपासणी होऊन लेखी परवानगी मिळाल्याशिवाय व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार नाही. निलंबन काळात संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना या प्रतिष्ठानांवर लक्ष ठेवण्याचे आणि व्यवसाय बंद असल्याची खात्री करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
अन्नसुरक्षेशी तडजोड खपवून घेणार नाही!
"सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे. अन्यथा यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील," असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ने केलेल्या या कारवाईमुळे मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित