माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

✍️ महाराष्ट्र वाणी.com

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.६ :– राज्य माहिती आयोगाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या उपस्थितीत आज राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर कार्यालयात माहिती अधिकार सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती अधिकार कायद्याचा नागरिकांनी सुज्ञतेने वापर करून शासनाशी संवाद साधावा, असे आवाहन माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी केले. 

राज्य माहिती आयोग खंडपीठ छत्रपती संभाजीनगर कार्यालयात 5 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत माहिती अधिकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्य माहिती आयोगाचे उपसचिव राजाराम सरोदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक संचालक गणेश फुंदे आदी उपस्थित होते. 

माहिती आयुक्त श्री.इंदलकर म्हणाले, राज्य माहिती आयोगाच्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारली त्यावेळी 8 हजार 500 अपील अर्ज प्रलंबित होते. आज ती संख्या 6 हजार 500 वर आली आहे. आगामी 3 महिन्यात ही संख्या 0 असेल असे नियोजन करण्यात आले आहे. जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती अर्जदारास विहित कालमर्यादेत देणे आवश्यक आहे. नागरिकांना योग्य माहिती मिळाल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो. त्यामुळे जनमाहिती अधिकारी व अपिलिय अधिकारी यांनी नागरिकांच्या अर्जांवर गतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. 

उपसचिव श्री.सरोदे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसंबधी आपले अनुभव सांगितले. तसेच माहिती अधिकार सप्ताहाबाबत सविस्तर माहिती दिली. 

पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपअधिक्षक गौतम पगारे, सह पोलीस आयुक्त श्रीमती वसुंधरा बोरगावकर, यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. अपिलार्थी ॲड.राजेश शहा, अपिलार्थी श्री.जाधव, अपिलार्थी चंद्रहार यादव, देवानंद खंदारे यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना माहिती मिळविताना येणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली. यावेळी अधिकारी, कर्मचारी, अपिलार्थी नागरिक उपस्थित होते.