महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची घरपोच पडताळणी; निवडणूक आयोगाची ‘महासर्वेक्षण’ मोहीम सुरू!
महाराष्ट्र वाणी
मुंबई,(प्रतिनिधी) दि. १४ :- भारत निवडणूक आयोगाने देशभरातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, महाराष्ट्रात तब्बल ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेमुळे राज्यातील मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे.
बीएलओ थेट घरोघरी जाणार
या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करणार आहेत. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशीलाची तपासणी केली जाणार असून, या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) देखील सहकार्य करणार आहेत.
जनगणना आणि मतदार पुनरिक्षणाची सांगड
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पुनरिक्षण प्रक्रिया जूनपासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर
२० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी भेटी व माहिती संकलन
५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे आणि हरकती नोंदणी
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
राजकीय पक्षांनाही आयोगाचे आवाहन
मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले BLA नियुक्त करावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. यामुळे दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे हटवणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी अधिक पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
“मतदार यादीतील प्रत्येक नाव अचूक करण्यासाठी आता निवडणूक यंत्रणा थेट तुमच्या दारात येणार!”