मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू
मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. २६ :- खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यतूट आणि अन्य निकषांच्या आधारे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील ८ जिल्ह्यांतील ७४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये शासनाचा Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाला असून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील एकूण २६५ तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुके

छत्रपती संभाजीनगर – ९ तालुके :

छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री.

जालना – ८ तालुके :

बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद.

बीड – ११ तालुके :

बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी.

लातूर – १० तालुके :

लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि जळकोट.

धाराशिव – ८ तालुके :

धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा.

नांदेड – १४ तालुके :

नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव.

परभणी – ९ तालुके :

पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी.

हिंगोली – ५ तालुके :

हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत.

शेतकऱ्यांना विविध सवलती

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या पंपांनाही संबंधित सवलत लागू राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.

टंचाईग्रस्त भागात पाणी, चारा आणि रोजगाराची व्यवस्था

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोजगार हमी योजनेतील कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची कमतरता भासू न देणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

२६५ तालुक्यांत पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश

Trigger-1 लागू झालेल्या राज्यातील सर्व २६५ तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पिकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश आहेत.

पीक नुकसानीची मदत स्वतंत्र निर्णयाने

दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित