मनपा अर्थसंकल्प ‘डिजिटल ई-बुक’ स्वरूपात जाहीर करा; अँड. अझर पठाण यांची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि.१६ :—महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू असताना नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध सूचना पुढे येत आहेत. शहरातील ‘वेलकम शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था’ यांच्या वतीने सचिव अँड. अझर पठाण यांनी मनपा आयुक्तांना सर्वसमावेशक सूचना देत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचावी यासाठी मनपाने संपूर्ण बजेट आकर्षक ‘डिजिटल ई-बुक’ स्वरूपात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, अशी प्रमुख मागणी पठाण यांनी केली आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी ‘मिशन रिस्टार्ट’
शहरातील बंद पडलेल्या १४ मनपा शाळांचे आधुनिकीकरण करून त्याठिकाणी CBSE/ICSE बोर्डाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक वर्गात डिजिटल लायब्ररी, इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा उभाराव्यात. तसेच दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थी व मनपा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना थेट शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
‘उड्डाण’ स्पर्धा परीक्षा केंद्र
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी IIT-JEE, NEET व CET परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देणारे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे. तसेच पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ‘सुपर २००’ विद्यार्थ्यांची विशेष बॅच तयार करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्याची मागणीही निवेदनात आहे.
फेरीवाल्यांसाठी डिजिटल ओळख
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना QR कोड आधारित डिजिटल ओळखपत्रे देण्यात यावीत. अधिकृत विक्रेत्यांना नियोजित ‘हॉकर्स झोन’मध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर
घाटी रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी मनपाने स्वतःचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करावा. तसेच झोपडपट्टी भागात किमान दहा नवीन ‘आपला दवाखाना’ सुरू करून प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवाव्यात, असे निवेदनात नमूद आहे.
महिला व बालकल्याणासाठी निधी वाढ
महिला व बालकल्याण योजनांसाठी शासन निर्णयानुसार निव्वळ महसुलाचा ५ टक्के निधी राखीव ठेवून ६५ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक योजनेची आर्थिक मर्यादा १० लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम
प्रत्येक प्रभागातील आरक्षित जागांवर देशी वृक्षांचे संवर्धन करून ‘ओपन जिम’ उभाराव्यात, अशी सूचना देखील निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, अँड. अझर पठाण यांनी महापौर आणि विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन या सर्व सूचनांची सविस्तर माहिती दिली असून आगामी अर्थसंकल्पात त्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
— शहराचा विकास आणि पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांच्या सूचनांना मनपाने कितपत प्रतिसाद देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचत रहा — ‘महाराष्ट्र वाणी’ : तुमच्या शहरातील प्रत्येक हालचालीवर आमची नजर.