"मंत्री, आमदार गप्प... बेघर झालेल्या मुकुंदवाडीकरांच्या डोळ्यांत अश्रू — माजी खासदार इम्तियाज जलील एकटे धावले मदतीस!"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २२ जून :– जालना रोडवरील मुकुंदवाडी परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने केलेल्या कारवाईत अनेक गरीबांचे संसार जमीनदोस्त करण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील हे नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले असून, दोन मंत्री, चार आमदार, दोन खासदार असलेल्या या महानगरात एकही लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या आसवांना धीर देण्यासाठीही हजर नव्हता.
मात्र आज (२२ जून) रोजी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील मुकुंदवाडीला पोहोचले आणि पीडित नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या. "आमचे आक्रोश ऐकायला तरी तुम्ही आलात, बाकी कोण आलं नाही", अशा शब्दांत महिलांनी त्यांचे स्वागत केले. त्या प्रसंगी महिलांनी व स्थानिक नागरिकांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी जलील यांना हात जोडून विनंती केली – “तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करा.”
जलील यांनी उपस्थित नागरिकांना आश्वस्त करत, "मी तुमच्यासोबत आहे. ही कारवाई एका नेत्याच्या सांगण्यावरूनच झाली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला असून, याचा मी पाठपुरावा करणार आहे," असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
मनमानी कारवाईचा आरोप
पीडित नागरिकांच्या मते, अनेक भागांमध्ये अतिक्रमणे असतानाही केवळ मुकुंदवाडीवरील निवडक घरे आणि दुकानेच तोडण्यात आली, कारण ती कारवाई एखाद्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली करण्यात आली, असा थेट आरोप नागरिकांनी केला.
राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव
शहरात इतके लोकप्रतिनिधी असूनही कुणीही येऊन नागरिकांच्या दुःखात सहभागी झाले नाहीत, ही बाब धक्कादायक आहे. हा प्रकार लोकप्रतिनिधींना सामाजिक भान आहे का, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
प्रश्न अद्याप अनुत्तरित – बेघर झालेल्यांचे पुढे काय?
अतिक्रमण हटविल्यानंतर या कुटुंबांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाने केलेले नाहीत. शाळकरी मुलं, वृद्ध, स्त्रिया, लहान बाळं यांचा आजचा दिवस झोपडीत नव्हे तर आकाशाखाली गेला आहे.
"ही गरीब जनता आहे, त्यांचा आवाज दाबू नका, मी त्यांच्यासोबत आहे,"
— माजी खासदार इम्तियाज जलील यांचा निर्धार.