भाजप प्रदेश प्रवक्ते सुहास दाशरथे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेची ताकद वाढली
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. १९ :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुहास दाशरथे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम विश्वास असल्याचे सांगत, आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेशी अखंड एकनिष्ठ राहून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेत प्रवेश करताना दाशरथे यांनी सांगितले की, “शिवसेनेची विचारधारा ही सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारी आहे. या विचारांशी आपण मनापासून जोडलेलो असून, शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.”
या प्रवेशप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दाशरथे यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत करत, “अनुभवी, अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्व असलेले नेते शिवसेनेत आल्याने पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल. महानगरपालिका निवडणुकीत याचा निश्चितच फायदा होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदु घोडेले, युवासेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जैस्वाल, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षदा शिरसाट तसेच संपर्क संघटक प्रतिभा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी दाशरथे यांना नव्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपमधील महत्त्वाची जबाबदारी सांभाळल्यानंतर शिवसेनेत झालेल्या या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
— राजकारणात बदलाची ही घडी शहराच्या निवडणूक राजकारणाला नवी दिशा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.