भाजपचा मित्रपक्ष संपवण्याचा डाव सुरू; शिंदेंची दिल्ली धाव ‘सत्तारक्षणासाठी’ – सपकाळांचा आरोप

भाजपचा मित्रपक्ष संपवण्याचा डाव सुरू; शिंदेंची दिल्ली धाव ‘सत्तारक्षणासाठी’ – सपकाळांचा आरोप

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २६ :- भाजप ही सत्तेसाठी काहीही करण्याची सवय असलेली पक्षसंस्था आहे. विरोधकांना गिळून टाकल्यानंतर आता हा पक्ष आपल्या मित्रपक्षांनाच राजकीय नकाशातून पुसण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांना स्वतःच्या बळावर लढायला भाग पाडून शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमजोर करण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हाच डाव ओळखल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘आपला पक्ष व कारकीर्द वाचवण्यासाठी’ दिल्ली गाठल्याचा दावा सपकाळ यांनी केला.

सत्तेत असलेल्या तथाकथित ‘ट्रिपल इंजिन’ सरकारमध्ये सर्व काही ठिक असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष उसळल्याचे स्पष्ट दिसते, असे ते म्हणाले. सत्ता वाटप, स्वार्थ आणि कुरघोडी यामुळे महायुतीतले तिन्ही घटक परस्परांवरच अविश्वास दाखवत आहेत. अशा विचलित स्थितीत हे सरकार पाच वर्षे टिकेल का, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “सरकार त्यांचंच असूनही ते ओरडत आहेत. त्यांनी जर मातृभूमी फाऊंडेशनबाबत गंभीर आरोप केले असतील तर उच्चस्तरीय चौकशी किंवा एसआयटी बसवावी. आरोप खरे ठरले तर दोषींवर कडक कारवाई करावी, पण जर ते केवळ प्रसिद्धीसाठी आरडा-ओरडा करत असतील, तर सार्वजनिक जीवनातून बाजूला व्हावे,” असे आव्हान सपकाळ यांनी गायकवाडांना दिले.

अजित पवारांवर निशाणा साधताना सपकाळ म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली. नंतरच स्वतःच्या विधानांवरून यू-टर्न घेत, आम्ही तसा शब्द दिलाच नव्हता असे म्हणू लागले. त्यांचा निवडणूक जाहीरनामा दाखवत तथ्य सांगितले तरी ते भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलूनही निर्धाराने बोलण्याची भाजपची शैली त्यांनी उचललीय. वाणी नाही पण गुण मात्र लागलेत,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.