“बळीराजाच्या काळ्या दिवाळी”चा राष्ट्रवादीचा हल्ला — अतिवृष्टी, खोटी आश्वासने आणि अन्यायाविरोधात छत्रपती संभाजीनगरात उपोषण!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात सरकारने आणखी अंधार घातला आहे. तुटपुंजी मदत, खोटी आश्वासने आणि दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील बळीराजाची दिवाळी यंदा “काळी दिवाळी” ठरली आहे.
याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य उपोषण आंदोलन करण्यात आले. सत्ताधुंद महायुती सरकारचा तीव्र निषेध करत शेतकऱ्यांच्या हक्कांच्या मागण्या यावेळी जोरदारपणे मांडण्यात आल्या.
‘सर्वाधिक प्रगत राज्य’ असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्रात आज अन्नदाताच सर्वाधिक उपेक्षित ठरला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. “सातबारा कोरा करू” म्हणणाऱ्यांनी आज कर्जमाफीचा ‘क’ उच्चारलाही नाही. उलट ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून ठेवले, असा हल्लाबोल यावेळी करण्यात आला.
बळीराजाच्या व्यथांना सरकारने कानाडोळा केल्याने, सत्तेच्या मस्तीत असलेल्या नेत्यांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी “काळी दिवाळी” आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
या उपोषणात माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार संजय वाघचौरे, सुधाकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष पाडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष खाजाभाई, युवक अध्यक्ष अतुल गांवडे, सुशील बोर्डे, मुन्नाभाई, आशीष पवार, राहुल ताठे, हरीदास शेलार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सेलप्रमुख व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 बळीराजाच्या दिवाळीतला अंधार दूर होईपर्यंत राष्ट्रवादीचं आंदोलन सुरूच राहणार!