“बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी केल्यास कठोर कारवाई” — पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचा स्पष्ट इशारा

“बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी केल्यास कठोर कारवाई” — पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचा स्पष्ट इशारा
“बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी केल्यास कठोर कारवाई” — पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचा स्पष्ट इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 25 मे रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला शहरातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरू, मस्जिदींचे इमाम, ईदगाह कमिटी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे सदस्य तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी 28 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सणादरम्यान महाराष्ट्र प्राणी संवर्धन (सुधारीत) 1995 कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत कत्तलखान्यांमध्येच कुर्बानी करण्यात यावी, उघड्यावर मांसाची ने-आण करू नये तसेच शासनाने परवानगी दिलेल्या जनावरांचीच कुर्बानी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

“बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला.

यावेळी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. कोणतीही संशयास्पद घटना, अनुचित प्रकार किंवा समाजकंटकांची माहिती तात्काळ पोलिसांना अथवा नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री 112 क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले.

बकरी ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने शहरभर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात 6 चेकपोस्ट उभारण्यात आले असून त्या ठिकाणी पोलीस अधिकारी, वाहतूक कर्मचारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी 24 तास तैनात राहणार आहेत. याशिवाय 3 विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये गुन्हे शाखा आणि परिमंडळ पथकांचा समावेश आहे.

शहरातील संवेदनशील व गर्दीच्या भागात गणवेशातील तसेच साध्या वेशातील पोलिसांची विशेष गस्त राहणार आहे. बंदोबस्तासाठी 4 पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 58 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, 986 पोलीस कर्मचारी, 49 महिला पोलीस, 7 कॅमेरामन, 1 एसआरपीएफ कंपनी तसेच 400 पुरुष व 100 महिला होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.

बैठकीत मुस्लिम धर्मगुरूंनीही शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन करत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवून सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांनी केले.

या बैठकीला प्रशांत मोहिते, पंकज अतुलकर, रत्नाकर नवले यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मौलाना अब्दुल रशीद मदनी, मौलाना इकबाल अन्सारी, विविध ईदगाह कमिटीचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक जावेद कुरेशी, रशीद मामु यांच्यासह कुरेशी जमातचे अध्यक्ष ईसा कुरेशी, गजानन बारवाल, डॉ. मुर्तूजा, एजाज झैदी यांच्यासह आणि सुमारे 200 ते 250 प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

“शांतता, कायद्याचे पालन आणि सामाजिक ऐक्य राखत बकरी ईद साजरी करा,” असा संदेश प्रशासनाने शहरवासियांना दिला आहे.