प्रत्येक तालुक्यात दि.१५ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार विवाहपूर्व संवाद केंद्र

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२८ :- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र येत्या १५ ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आले आहे. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात असे केंद्र स्थापन करावयाचे आहे. त्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षक, तालुका महिला बालविकास अधिकारी, संरक्षण अधिकारी आदींची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक तालुक्यात हे केंद्र कार्यान्वित करावे. त्यासाठी संवाद केंद्रात संवाद साधणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नावे निश्चित झाले की त्यांना राष्ट्रीय महिला आयोगामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर हे कर्मचारी प्रत्यक्ष संवाद साधू शकतील. त्यासाठी कर्मचारी निवड, प्रशिक्षण आदी प्रक्रिया पूर्ण करुन येत्या १५ ऑगस्ट रोजी हे केंद्र प्रत्येक तालुक्यात कार्यान्वित व्हावे. विवाहपूर्व वाग्दत्त दाम्पत्याला वा त्यांच्या नातेवाईकांना विवाहाशी निगडीत वा विवाह पश्चात उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांबाबत परस्पर संवाद साधता यावा यासाठी हे केंद्र तयार करण्याची आयोगाची संकल्पना आहे. त्यानुसार जिल्ह्यात हे केंद्र कार्यान्वित असून आता ते तालुकास्तरावर कार्यान्वित व्हावे, यासाठी आज घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.