पुस्तकांना मित्र बनवा, जग तुम्हाला मित्र बनवेल! विद्यार्थ्यांना मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांचा प्रेरणादायी संदेश
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात ‘वाचू आनंदे’ पुस्तकपेटी उपक्रमाचा शुभारंभ; ग्रामीण भागातील १२ गावांतील शाळांना पुस्तकपेट्यांचे वाटप
कन्नड दि २६ :- मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृती रुजावी आणि ग्रामीण भागातील मुलांनाही ज्ञानाची दालने खुली व्हावीत, या उद्देशाने सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘वाचू आनंदे’ हा अभिनव पुस्तकपेटी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांपर्यंत पुस्तकांचा खजिना पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका व सेवानिवृत्त प्राचार्या छाया महाजन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना छाया महाजन म्हणाल्या की, ज्ञान मिळविण्यासाठी जिज्ञासा आणि बौद्धिक क्षमता आवश्यक असते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना नवनवीन पुस्तके वाचण्याची प्रेरणा देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. माहिती आणि ज्ञान मिळविण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे पुस्तके होय. पुस्तकांमुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध व प्रगल्भ होते. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे माणसांमधील संवाद कमी होत असून, पुस्तकांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण आणि सामाजिक संवाद पुन्हा समृद्ध होऊ शकतो. मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवणही पुस्तकांतूनच मिळते, असे त्यांनी नमूद केले.
‘पुस्तकांशी मैत्री करा, जग तुमच्याशी मैत्री करेल!’
कार्यक्रमात रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनो, पुस्तकांना आपला मित्र बनवा, जग तुम्हाला मित्र बनवेल. तुम्ही पुस्तकांसाठी वेळ द्या, लोक तुमच्यासाठी वेळ देतील. जगात पुस्तकापेक्षा चांगला मित्र दुसरा नाही. पुस्तकेच माणसाला विचारांनी जिवंत ठेवतात.”
वाचनालयाला भेट दिल्यानंतर तेथील सुविधा आणि पुस्तकसंग्रह पाहून आनंद झाल्याचे सांगत त्यांनी स्वतःच्या हस्ते पुस्तकांचे वाटप केल्याचा अनुभवही विद्यार्थ्यांसोबत शेअर केला.
यावेळी त्यांनी ‘मरियम मिर्झा मोहल्ला बाल वाचनालय’ अभियानाची माहिती दिली. मरियम मिर्झा हिने इयत्ता सहावीत शिकत असतानाच मुलांसाठी पहिले मोहल्ला वाचनालय सुरू केले. अवघ्या एका वर्षात या उपक्रमातून २५ वाचनालये उभी राहिली. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२, परभणीत १५, हैदराबादमध्ये ५ आणि बुरहानपूरमध्ये ५ अशी एकूण ६७ बालवाचनालये कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यातही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी आपण नियमित येत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
१२ गावांतील शाळांना पुस्तकपेट्यांची भेट
या उपक्रमांतर्गत रीड अँड लीड फाउंडेशनच्या वतीने घाटशेंद्रा येथील उर्दू शाळेला १०० उर्दू पुस्तकांची पुस्तकपेटी भेट देण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील १२ गावांमधील जिल्हा परिषद शाळांनाही प्रत्येकी १०० पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकपेट्या प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षणाधिकारी गीता तांदळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारे असे प्रयत्न सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी वाचनालयाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम हे वाचनालय करीत आहे. सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांनी आपल्या कार्यातून जनहिताचे अनेक आदर्श निर्माण केले. अत्यल्प खर्चात वाचनालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, सीमा मेहेत्रे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत देशमुख, डॉ. आनंदराव महाले, प्राचार्य डॉ. विजय भोसले, रामकृष्ण पवार, मुख्याध्यापिका सुनीता दळवी, कौतिकराव पवार, रामकृष्ण तुपे, प्रा. अंबादास सगट, प्रा. हुकूमचंद पवार, प्रा. शिवाजी हुसे, प्रा. अशोक भोसीकर, विविध जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. संजय त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
पुस्तकपेट्यांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचा हा उपक्रम केवळ पुस्तकांचे वाटप नसून, नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याची एक महत्त्वपूर्ण चळवळ ठरत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित