**पाणी वाहतुकीच्या ट्रॅक्टर-टँकर चोरीचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – आरोपी जेरबंद, 3.66 लाखांचा मुद्देमाल जप्त**

**पाणी वाहतुकीच्या ट्रॅक्टर-टँकर चोरीचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – आरोपी जेरबंद, 3.66 लाखांचा मुद्देमाल जप्त**

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- पाणी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर व टँकर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मुख्य आरोपीस अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी नितीन रंगनाथ मोरे (वय 36, रा. कांचननगर, नक्षत्रवाडी) यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर व टँकर चोरीप्रकरणी गु.र.नं. 03/2026, कलम 303(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की, पांडुरंग गोरख दसपुते व विशाल राजगुरू (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाने शिताफीने कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.

विश्वासाने केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात चोरी केलेला ट्रॅक्टर उटवद (ता.जि. जालना) येथे अजय बद्रीनाथ राऊत यांच्या ताब्यात दिल्याचे उघड झाले, तर टँकर सिध्दीविनायक नगर, करमाड येथील मोकळ्या जागेत लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, ओळख लपवण्यासाठी टँकरचा पिवळा रंग बदलून लाल-पांढरा रंग देण्यात आला होता.

पोलिसांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकून एकूण 3 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सपोनि पवन इंगळे, तसेच पोलीस अंमलदार विष्णु गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, योगेश तरमळे, संजय तांदळे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

 कायद्याचा धाक दाखवत चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी ही कारवाई – गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा ठरते!