“निवडणुकीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!”प्रशिक्षणाला गैरहजर 800 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

“निवडणुकीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!”प्रशिक्षणाला गैरहजर 800 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश
“निवडणुकीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही!”प्रशिक्षणाला गैरहजर 800 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  दि. ८ :—

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला.

दिनांक २८ डिसेंबरपासून सुरू असलेले हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ८ यांच्या अंतर्गत एकूण ७,५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा; एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मुख्य नाट्यगृह अशा चार ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आले.

मात्र या चारही केंद्रांवर एकूण ८०० कर्मचारी अनुपस्थित असल्याचे समोर आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी गैरहजर सर्व ८०० कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश दिले.

“अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कोणतीही माफी नाही. लोकशाही टिकवणे ही शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. निवडणुकीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

विद्यापीठ सभागृहात झालेल्या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांचे विशेष कौतुक केले. आज्जीचे निधन झाले असतानाही फक्त एक दिवसाची रजा घेऊन पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याचे उदाहरण त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर मांडले.

या वेळी आयुक्त जी. श्रीकांत यांनी चारही प्रशिक्षण केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

— लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रशासन आता कोणतीही तडजोड करणार नाही, हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.