दुष्काळसदृश परिस्थितीवर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

दुष्काळसदृश परिस्थितीवर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
दुष्काळसदृश परिस्थितीवर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई, दि. २३ :- राज्यातील पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घ्याव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

राज्यातील दुष्काळ परिस्थिती तसेच ‘सेवा संकल्प अभियान’च्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

पावसातील खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच हे पंचनामे ग्रामसभेत मांडावेत, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

पंचनाम्याची कार्यपद्धती स्पष्ट करणारी एसओपी तातडीने तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याचे पाणी, जलसंधारण, कृषी आणि वीजपुरवठा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यासोबतच भूजलपातळी वाढविण्यासाठी पाणी जमिनीत मुरविणाऱ्या उपाययोजनांवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पावसाच्या खंडामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात प्रत्यक्ष परिस्थितीचे अचूक मूल्यांकन होऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक सक्रियपणे काम करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले.

महाराष्ट्र वाणी — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित