“दीड लाखांनी पाडले तरी समजत नाही! — सत्तारांचा दानवेंवर घणाघाती प्रहार”
महाराष्ट्र वाणी
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर तुफान टीका करत मराठवाड्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापवले आहे. “जो माणूस बोगस असतो, तो बोगसच बोलतो,” अशा शब्दांत सत्तारांनी दानवे यांच्यावर निशाणा साधला. भोकरदन विधानसभा निवडणुकीत काय झाले याची आठवण त्यांना वारंवार होत आहे, असा टोला सत्तारांनी लगावला.
सत्तार म्हणाले, “त्यांना पराभवाची चीड अजूनही शांत झालेली नाही. दीड लाख मतांनी हरले… मग ती मते बोगस असोत किंवा खरी असोत, पराभव तर पराभवच.” पराभवाचा धक्का बसला की त्यांना प्रत्येकवेळी माझी आठवण होते, अशी टीका त्यांनी केली.
दानवेंचा ‘गैरसमज’ दूर करताना सत्तार म्हणाले, “लोकसभेला त्यांना मी पाडले, हा त्यांचा गैरसमज आहे. मी पाडलेलं नाही… ते स्वतः पडले! पाडले आणि पडले यात फरक आहे. 25 वर्षे आम्ही त्यांना निवडून दिलं तेव्हा बोगस मतांचा प्रश्न का आला नाही? लोकांनी त्यांना नाकारलं, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. दीड लाख मतांनी पराभूत होणाऱ्याची लायकी काय असते हे लोकांना माहिती आहे.”
जिल्हा परिषदेत युती नाही — सत्तार
स्थानिक पातळीवरील परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आम्ही युती करणार नाही… स्वतंत्र लढणार.”
तथापि, “मी कुठेही नाराज नाही. मंत्रिपद येतं-जातं, पण मी सामान्य माणूस, सामान्य आमदार हेच माझं मूळ पद,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात शिवसेना–भाजप संघर्ष पुन्हा भडकणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.