दिवसा घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद; दोन गुन्हे उघड, १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिवसा घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद; दोन गुन्हे उघड, १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- दिवसा बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात फिर्यादी ज्ञानेश्वर रखमाजी जाधव (वय ३०, रा. वैजापूर) यांनी ९ फेब्रुवारी रोजी विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासह वर्षश्राद्धासाठी धानोरा (ता. गंगापूर) येथे गेले असताना, अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील लॉकरमधून ५० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून सुमारे ३० संशयितांची पडताळणी केली.

तपासातून आजब्या महादु भोसले (वय ३०, रा. अंतापूर शिवार, ता. गंगापूर) याच्यावर संशय बळावला. ४ मार्च रोजी तो मोटारसायकलवरून गंगापूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गंगापूर-भेंडाळा रस्त्यावर सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने ९ फेब्रुवारी रोजी गाढेपिंपळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून ५० हजार रुपये व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच २ फेब्रुवारी रोजी शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कनकोरी येथेही बंद घर फोडून ७० हजार रुपये व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले असून एकूण दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी विरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पो.उपनि. महेश घुगे, प्रमोद पाटील, सचिन राठोड, तसेच सुनील गोरे, बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप व फिंगरप्रिंट विभागाचे मुहमद पठाण, परमेश्वर आडे, दिनेश जाधव यांच्या पथकाने केली.

🔎 वाचा, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी — फक्त ‘महाराष्ट्र वाणी’वर!