तिकिटांच्या सौद्यात निष्ठेचा बळी! महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते रस्त्यावर

तिकिटांच्या सौद्यात निष्ठेचा बळी! महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते रस्त्यावर

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० :- महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस गोंधळ, नाराजी आणि आक्रोशाने गाजला. 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी इच्छुक उमेदवारांना “वेळेत बी-फॉर्म देऊ” असे आश्वासन देत अर्ज भरण्यास सांगितले होते. मात्र, ऐन वेळेस बी-फॉर्म दुसऱ्याच उमेदवाराच्या हाती गेल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या.

विशेष म्हणजे, काही पक्षांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्या निष्ठावंतांना डावलत नवख्या व बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याने भाजप व शिवसेना पक्ष कार्यालयांमध्ये दिवसभर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. भाजप कार्यालयात तर एका महिला कार्यकर्तीने थेट उपोषण सुरू केले. तर दुसरी कडे MIM पक्षात तर तिकट वाटपाच्या कारणावरून थेट पक्षाचे महाराष्टाचे अध्यक्ष माजी खासदार इम्तीयाज जलील यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी व इतर पदाधिकारी यांनी केली.

निष्ठा आणि निष्ठावंतांची किंमत जिथे वेळोवेळी लिलावात काढली जाते, त्यालाच आजचे राजकारण आणि निवडणूक व्यवस्थापन म्हणावे लागेल, अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आयत्या वेळी पक्षांतर करून आपले तथाकथित वर्चस्व सिद्ध करणारे आणि त्यांच्याविरोधात कुरकुर करणारे निष्ठावंत — या दोघांचेही राजकारणात “हार्दिक स्वागत” असल्याचे कटू वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

येथे प्रश्न निष्ठेची व्याख्या बदलली का कार्यकर्त्यांना तिचे मर्म कळले नाही, हा नाही. खरा मुद्दा आहे तो फक्त निवडून येण्याचा. निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी केवळ पक्ष मोठा आणि नेतृत्व प्रभावी असणे पुरेसे नसून, ‘हूजूर’ म्हणून वागण्याची सवय, प्रचंड आर्थिक ताकद आणि समाजात दहशत निर्माण करण्याची क्षमता असावी लागते, असा संदेशच या प्रक्रियेतून दिला जात आहे.

कालपर्यंत ज्यांना शिव्याशाप दिले, त्यांच्याशीच आज युती-आघाड्या केल्या जातात आणि या सगळ्यात नेहमीच बळी जातो तो कार्यकर्ताच, हा आजवरच्या प्रत्येक निवडणुकीचा अनुभव आहे. या बळी जाण्यालाच आज निष्ठावान असणे म्हटले जाते, असे चित्र शहरातील राजकीय वातावरणात स्पष्टपणे दिसून येत आहे.

राजकारण बदलतं, पक्ष बदलतात… पण प्रत्येक निवडणुकीत निष्ठावंतांचा बळी मात्र कायम असतो.