जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक; भाजपमध्ये नावांवर जोरदार चर्चा, महायुतीत पदांची गणिते सुरू
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी १८ मार्च रोजी निवडणूक होणार असून, त्याआधी पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापती पदांची निवडणूक १० मार्च रोजी होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी भाजपकडून नेमके कोणाचे नाव पुढे येणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सध्या भाजपकडून अविनाश गलांडे (महालगाव), गोपाल वाघ (वडोद बाजार), डॉ. संजय गव्हाणे (देवगाव रंगारी) आणि पुष्पाबाई काळे (आमखेडा) यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय मात्र पक्षश्रेष्ठी आणि महायुतीतील चर्चेनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हा परिषदेत एकूण ६३ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे एका पुरस्कृत सदस्यासह २४ सदस्य होते. नागद गटाच्या सदस्या तृप्ती राजपूत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद २५ वर पोहोचली आहे. तर शिंदे गटाचे एका पुरस्कृतसह २२ सदस्य, ठाकरे गटाचे ९, अजित पवार गटाचे ४, शरद पवार गटाचा १, काँग्रेस १, प्रहार १ आणि एक अपक्ष सदस्य असे संख्याबळ आहे.
या गणितानुसार अध्यक्षपद भाजपकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र बहुमत अधिक भक्कम करण्यासाठी शिंदे गटाची साथ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पदवाटपावर चर्चा होण्याची शक्यता असून शिंदे गटाकडून उपाध्यक्षपदाची मागणी होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत सर्व सदस्य मतदानाद्वारे नव्या अध्यक्षांची निवड करणार आहेत.
आता अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.