जिद्दीची झेप! फुलंब्रीतील गृहिणी बनली उद्योजिका; पाणीपुरी-ज्यूस सेंटरमधून महिन्याला लाखाची कमाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २१ :- जिद्द, मेहनत आणि योग्य संधी यांचा संगम झाला तर यश दूर राहत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे फुलंब्री तालुक्यातील सुनिता संतोष शिंदे. एका साध्या गृहिणीपासून यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
फुलंब्री येथील रहिवासी असलेल्या सुनिता शिंदे यांनी २०१९ मध्ये ‘स्वामी समर्थ महिला बचत गटात’ प्रवेश घेत आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. बचतीसोबतच व्यवसायाची दृष्टी विकसित करण्यासाठी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ‘आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्रा’तर्फे आयोजित विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी सुरुवातीला बँक कर्जाच्या सहाय्याने रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केले.
मात्र, बदलत्या काळानुसार नव्या संधी ओळखत त्यांनी २०२० मध्ये पाणीपुरी व्यवसायात पाऊल टाकले. बचत गटातून घेतलेल्या ५० हजार रुपयांच्या कर्जावर त्यांनी पाणीपुरी गाडी सुरू केली. सुरुवातीला दररोज १,००० ते १,५०० रुपयांची उलाढाल होत असताना, त्यांच्या मेहनतीमुळे हा व्यवसाय लवकरच गती पकडू लागला.
यानंतर त्यांनी वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे २ लाख रुपयांचे भांडवल उभे करत व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटर सुरू केले. आज त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून दररोज २,५०० ते ३,००० रुपयांची उलाढाल होत असून मासिक उलाढाल २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सर्व खर्च वजा जाता सुमारे १ लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होत आहे.
खुलताबाद रोड, फुलंब्री येथे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत त्यांचा व्यवसाय सुरू असतो. विशेष म्हणजे, त्यांनी बचत गटातील दोन महिलांना रोजगार उपलब्ध करून देत स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून व्यवसाय सुरू करावा. बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो,” असा संदेश सुनिता शिंदे यांनी दिला आहे.
त्यांच्या या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून, ‘महिला सक्षम तर समाज सक्षम’ हा संदेश अधिक बळकट होत आहे.
👉 छोट्या सुरुवातीपासून मोठं यश—सुनिता शिंदे यांची कहाणी प्रत्येक महिलेला उभं राहण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे!