‘जिद्द, कष्ट आणि ध्येयाने बदलली कहाणी!’ – वाहेगावच्या संगीता घोडके यांची प्रेरणादायी यशोगाथा

‘जिद्द, कष्ट आणि ध्येयाने बदलली कहाणी!’ – वाहेगावच्या संगीता घोडके यांची प्रेरणादायी यशोगाथा
‘जिद्द, कष्ट आणि ध्येयाने बदलली कहाणी!’ – वाहेगावच्या संगीता घोडके यांची प्रेरणादायी यशोगाथा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २० :– पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील संगीता अण्णासाहेब घोडके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची मिळालेली साथ ही त्यांच्या यशाची भक्कम पायाभरणी ठरली.

साध्या कुटुंबातील संगीता घोडके यांना तीन मुली व एक मुलगा असून, पती कंपनीत चालक म्हणून कार्यरत आहेत. केवळ मजुरीवर संसार चालवताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, परिस्थितीपुढे न झुकता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सुरुवातीला त्यांनी शिवणकामासाठी मशीन घेतले. दिवसभर मजुरी करून संध्याकाळी ब्लाउज शिवण्याचे काम सुरू केले. यातून थोडी बचत होताच त्यांनी गावातील वीज समस्येचा विचार करून इंजिनवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली. वीज नसताना गिरणी आणि वीज असताना शिवणकाम, अशा दुहेरी मेहनतीतून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग अधिक मजबूत केला.

यानंतर बचत गट व बँकेच्या कर्जाच्या मदतीने त्यांनी खारीक-खोबरे व चिक दळण्याच्या गिरण्या सुरू केल्या. या व्यवसायातून दररोज सुमारे १००० ते १५०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले. पुढे त्यांनी पापड निर्मितीचे मशीन घेतले आणि त्यातूनही दररोज ५०० ते ६०० रुपयांची कमाई सुरू झाली.

या सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. तीन मुलींचे विवाह यशस्वीरित्या पार पाडले असून, मुलगा सध्या मुंबई येथे आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी साडेतीन एकर शेतीही विकत घेतली आहे, जे त्यांच्या यशाचे मोठे प्रतीक ठरते.

संगीता घोडके यांचा हा संघर्षमय ते यशस्वी प्रवास ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “प्रत्येक महिलांनी काही ना काही जोडधंदा करून स्वावलंबी व्हावे. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश नक्की मिळते,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

👉 कष्ट, जिद्द आणि योग्य दिशा मिळाली तर कोणतीही महिला स्वतःचे आयुष्य बदलू शकते—संगीता घोडके यांची कहाणी याचाच जिवंत पुरावा आहे!