जिल्हा परिषद–पंचायत समिती रणधुमाळीला सुरुवात; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड, दि. ३१ :- महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, येत्या काही दिवसांत किंवा मनपा निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
याच अनुषंगाने सिल्लोड येथे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी शिवसेनेचे तालुका, शहर व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची सामाजिक प्रतिमा, सामाजिक व विकासकामातील सहभाग, संबंधित गट व गणातील गावांची भौगोलिक व राजकीय माहिती, मागील निवडणुकांतील कामगिरी, स्थानिक जनसंपर्क, सामाजिक समीकरणे तसेच पक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. उमेदवारांचा जनाधार, कार्यकर्त्यांशी असलेले संबंध आणि पक्षासाठी केलेले योगदान हे निकष विशेषत्वाने तपासण्यात आले.
शिवसेना पक्ष आगामी निवडणुकांमध्ये मजबूत व लोकांमध्ये विश्वास असलेले उमेदवार देण्याच्या भूमिकेत असल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झाले. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देत, तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाने मांडली.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दणदणीत यश मिळवले आहे. एकूण २८ पैकी २५ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले असून, नगराध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार हे विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. या यशामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमधील या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापू लागले असून, येत्या काळात उमेदवार निवडीबाबत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
— राजकारणाच्या प्रत्येक हालचालीसाठी आमच्याशी जोडलेले राहा…