जाफरगेट मोंढा रविवार बाजार परिसरातील अनधिकृत अतिक्रमण निष्काशित; मनपाची धडक कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि २० :- महानगरपालिका अंतर्गत जाफरगेट मोंढा येथील रविवार आठवडी बाजारालगत तसेच दर्गा पीर कल्याणशाह मस्जिद परिसरात अंदाजे ८० x ५० फूट आकाराच्या जागेत अनोळखी व्यक्तीकडून महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लोखंडी अँगल व निळ्या रंगाच्या टिनपत्र्यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
या अनधिकृत बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांकडून मा. प्रशासक तथा आयुक्त आणि झोन क्र. २ (जी) चे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल होत होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त प्रभाग क्र. २ (जी) यांनी दहा दिवसांपूर्वी स्थळ पाहणी करून संबंधित व्यक्तीस काम थांबविण्याच्या सूचना देत, मनपाकडून रितसर परवानगी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, सूचनांचे पालन करण्यात आले नाही.
सदर जागेवर दर रविवारी आठवडी बाजार भरत असून रस्त्यालगत सुमारे ३० ते ३५ दुकाने असतानाही संबंधित व्यक्तीने टिनपत्रे उभारून जनावरे बांधणे व भंगार वाहने उभी करून जागेवर बेकायदेशीर कब्जा केल्याचे निदर्शनास आले.
आज दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मा. प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सायंकाळी ४.३० वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जाफरगेट येथील रविवार आठवडी बाजार परिसरात जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत टिनपत्रे व इतर अतिक्रमणे निष्काशित केली.
ही कारवाई मा. प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशाने, नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग श्री. संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त श्री. रमेश मोरे, अतिक्रमण निरीक्षक श्री. सय्यद जमशीद, श्री. सागर, श्री. देसाई तसेच नागरी मित्र पथकाच्या उपस्थितीत पार पडली.
शहरातील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.