छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय! समीर राजुरकर महापौर, जंजाळ उपमहापौर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १० —
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ नंतर शहराच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित विशेष बैठकीत महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली आणि शहराच्या सत्ताकेंद्रावर नवे नेतृत्व अधिकृतपणे विराजमान झाले.
या निवड प्रक्रियेचे कामकाज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत तसेच नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती.
विहित नियमांनुसार पार पडलेल्या निवड प्रक्रियेत श्री. समीर सुभाष राजुरकर यांची महापौरपदी, तर श्री. जंजाळ राजेंद्र हिंमतराव यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
या निवडीमुळे महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे स्पष्ट झाली असून, आगामी काळात शहराच्या विकासासोबतच राजकीय संघर्षही अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्ष म्हणून MIM सक्रिय असल्याने मनपात वेळोवेळी खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सभागृहात जोरदार वादविवाद आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो.
निवडीनंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विरोधकांकडूनही हालचालींना वेग आला आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला असून, महानगरपालिकेच्या आगामी कार्यकाळासाठी नव्या वैधानिक कारभाराचा प्रारंभ झाला आहे.
ही निवड केवळ पदांची नाही — छत्रपती संभाजीनगरच्या सत्तेच्या राजकारणात नव्या खेळीची सुरुवात आहे!