घाटीचा डंका राज्यभर! डॉ. मयूर पाटील एमएस परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम; ऑर्थोपेडिक विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा!
एकाच महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा टॉपटेनमध्ये समावेश; ईएनटी विभागाचेही घवघवीत यश, गोल्ड मेडलवरही घाटीची मोहोर
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- वैद्यकीय शिक्षण आणि गुणवत्तेच्या क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या एमएस परीक्षेत घाटीच्या अस्थिव्यंगोपचारशास्त्र (ऑर्थोपेडिक) विभागातील डॉ. मयूर पाटील यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील सर्वोच्च स्थान मिळाल्याने घाटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष म्हणजे, या परीक्षेत घाटीच्या ऑर्थोपेडिक विभागातील तब्बल तीन विद्यार्थ्यांनी राज्यातील पहिल्या दहा गुणवंतांमध्ये स्थान मिळवले. डॉ. मयूर पाटील यांनी प्रथम, डॉ. मोहम्मद शहजाद यांनी चौथा, तर डॉ. किरण शेळके पाटील यांनी सातवा क्रमांक पटकावला. याशिवाय विभागातील अन्य नऊ विद्यार्थीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यामुळे संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण आहे.
हे यश अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी संपादन केले. या यशात प्रा. डॉ. अनिल धुळे, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. गजानन देशमुख आणि डॉ. नीलेश कचनेरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
ईएनटी विभागाचीही चमकदार कामगिरी
घाटीच्या कान-नाक-घसा (ईएनटी) विभागानेही एमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. या विभागातील डॉ. ओजस् कुलकर्णी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर डॉ. कल्याणी उगले यांनी पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, जिरियाट्रिक्स विभागातील ऋषिकेश अनिलराव देशमुख यांनीही परीक्षेत यशस्वी होत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. त्यामुळे घाटीच्या यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.
विद्यार्थी आणि रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य : अधिष्ठाता डॉ. सुक्रे
या घवघवीत यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संस्थेत अत्याधुनिक यंत्रसामग्री व नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात मोफत वाय-फाय, संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, सुविधायुक्त वसतिगृह आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. हे यश केवळ एका विभागाचे नसून प्रशासन आणि सर्व विभागप्रमुखांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित असल्याचेही डॉ. सुक्रे यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान : डॉ. लिंगायत
ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विभागप्रमुख म्हणून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
घाटीच्या ऑर्थोपेडिक विभागात सर्वाधिक बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभाग (आयपीडी) चालवला जातो. रुग्णसेवेसोबतच शैक्षणिक गुणवत्तेतही विभागाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचे पाठबळ, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण विभागाच्या टीमवर्कमुळेच हे यश शक्य झाल्याचे डॉ. लिंगायत यांनी सांगितले.
एकूणच, एमएस परीक्षेतील ऑर्थोपेडिक आणि ईएनटी विभागाचे राज्यस्तरीय यश तसेच गोल्ड मेडलची कमाई यामुळे घाटीच्या वैद्यकीय शिक्षणाचा गुणवत्तेचा आलेख पुन्हा उंचावला आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित