गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर? संघटित टोळीवर कठोर कारवाईची लहु प्रहार संघटनेची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि ६ :- गोरगरीब व वंचित समाजातील, विशेषतः मातंग व बौद्ध समाजातील विद्यार्थी व युवकांच्या कागदपत्रांचा सायबर व आर्थिक गुन्ह्यांसाठी गैरवापर करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लहु प्रहार संघटनेच्या वतीने आज (दि. ६) छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विविध योजना, रोजगार, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत व इतर लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक विद्यार्थी व युवकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यात आली. या कागदपत्रांचा वापर करून संबंधितांच्या नावावर बँक खाती उघडणे, डिजिटल व्यवहार करणे तसेच सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसाठी त्यांचा गैरवापर होत असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
या प्रकारामुळे अनेक निरपराध विद्यार्थी व युवकांवर संशयाची छाया निर्माण झाली असून त्यांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रकरणांमध्ये इतर राज्यांतील तपास यंत्रणांकडून संबंधित युवकांची चौकशीही करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शेकडो विद्यार्थी व युवकांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून हा प्रकार संघटित सायबर आणि आर्थिक गुन्हेगारी रॅकेटचा भाग असू शकतो, असा संशय लहु प्रहार संघटनेने व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, सायबर पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास करावा, संपूर्ण टोळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, वापरण्यात आलेल्या बँक खाती, सिम कार्ड आणि डिजिटल व्यवहारांची चौकशी व्हावी तसेच निरपराध विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याशिवाय अनुसूचित जातीतील पीडित विद्यार्थ्यांचे स्वतंत्र जबाब नोंदवून गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी लहु प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, लहु सैनिक संघाचे अध्यक्ष रतन शेलार, रिपाईचे किशोर तुपे, लहुजी साळवे विकास परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप मानकर, गंगेश आघाम, ज्येष्ठ नेत्या सुवर्णा साबळे, राज्य संघटक मच्छिंद्र बहिलम, सचिन वाघुले, महिला आघाडीच्या महासचिव राजश्री साठे, शहर सरचिटणीस उज्वला साठे, जिल्हा उपाध्यक्ष मारिया साठे, हिरा तुपे, अलका शेंडगे, शोभा तुपे आदी उपस्थित होते.
"विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवर डल्ला टाकणाऱ्या टोळीवर कारवाई होणार का? या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे."