"‘कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?’ – राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर संतप्त सवाल"

हे साधन असावं, साध्य नाही. पण आजच्या राजकारणात याचा विसर पडलाय

"‘कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?’ – राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर संतप्त सवाल"

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, १८ जुलै :– काल विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट विचारलं आहे, "कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?"

राज ठाकरे म्हणाले, "सत्ता हे साधन असावं, साध्य नाही. पण आजच्या राजकारणात याचा विसर पडलाय. वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करायची आणि पुन्हा साधनशुचिता सांगायची ही भंपक शैली आता लोकांच्या लक्षात आली असेल, असं मी मानतो."

मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले, "मराठी माणसाच्या आणि भाषेच्या अपमानावर जर महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला, तर आमच्यावर तुटून पडणारे कुठे लपून बसलेत? आमचा प्रत्येक झटका भाषेसाठी असतो, व्यक्तिगत द्वेषातून नाही. माझ्या दिवंगत आमदाराने सुद्धा विधानभवनात एकदा असा झटका दिला होता, कारण मराठीचा अपमान सहन झाला नव्हता."

राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या खर्चावरूनही सत्ताधाऱ्यांना खडसावलं. "एका दिवसाचा अधिवेशन खर्च दीड ते दोन कोटींच्या घरात असतो, पण हे पैसे व्यक्तिगत कुरघोड्यांसाठी वापरले जातायत. राज्यात प्रश्नांचे डोंगर आहेत, निधी नाही, कंत्राटदारांना पैसे नाहीत आणि मंत्रीच प्रश्न विचारतायत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का?"

शेवटी, माध्यमांना आणि सरकारला इशारा देत ठाकरे म्हणाले, "साधनशुचिता असेल तर तुमच्या लोकांवर कारवाई करा. नाही तर लक्षात ठेवा – मराठी द्वेष करणाऱ्यांना माझे सैनिक थांबवणार नाहीत. मग आम्हाला अक्कल शिकवू नका."

– महाराष्ट्र वाणी न्यूज

"राजकारणाचा झगमगाट बाजूला ठेवून मराठी माणसाचा आवाज ऐका!"