ऑनलाईन फसवणुकीत पैसे गेले? ताबडतोब 'या' नंबरवर कॉल करा – मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वपूर्ण सल्ला!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, १८ जुलै :– राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. नागरिकांना या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी सरकारने अनेक तांत्रिक उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री म्हणाले, “२०२२ मध्ये सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण १६.४५ टक्के होतं, ते आता १९ टक्क्यांवर गेलं आहे. २०२१ मध्ये फसवणूक झालेल्या रकमेपैकी फक्त २.७५ टक्के रक्कम परत मिळत होती, आता तीच वसुली १६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही 100% समाधानकारक स्थिती नसली तरी प्रगती निश्चितच आहे. गोल्डन अवरमध्ये जर माहिती दिली गेली, तर ९०% प्रकरणांमध्ये पैसे वाचवता येतात.”
राज्यात ‘महापे’ अंतर्गत एक अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. “पुढील पाच वर्षांत पाच हजार पोलिसांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे यंत्रणा ‘सायबर कॉर्पोरेशन’मध्ये रूपांतरित झाली असून, इतर राज्येही आपला आदर्श घेत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
सायबर फसवणूक झाली तर '1930' किंवा '1945' वर फोन करा!
“सायबर गुन्हा घडताच ‘1930’ किंवा ‘1945’ या हेल्पलाइनवर तात्काळ कॉल केल्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने काही मिनिटांतच संबंधित रक्कम कुठेही गेली असली तरी अडवू शकतो. त्यासाठी डिजीटल फॉरेन्सिक, रिस्पॉन्स टीम, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर यांसारख्या यंत्रणा सज्ज आहेत,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात गुन्हेगारीत घट; नागपूर आघाडीवर!
राज्यातील गुन्हेगारीसंबंधी आकडेवारी सादर करताना फडणवीस म्हणाले, “२०२४ मध्ये ११,६५६ गुन्ह्यांनी घट झाली असून राज्यात ६.७५ टक्क्यांनी गुन्हे कमी झाले आहेत. नागपूरमध्ये ही घट ११ टक्के असून, तिथे ५८१ गुन्ह्यांची घट झाली आहे. नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, पण आकडेवारी वेगळंच सत्य सांगते. उलट, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे.”
सायबर फसवणुकीपासून वाचायचं असेल, तर लक्षात ठेवा – वेळेवर फोन केला तर तुमचे पैसे वाचू शकतात!