एसटी सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करा! राज्यभरात संतापाची लाट; १०० हून अधिक संघटना आंदोलनाच्या मैदानात

एसटी सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करा! राज्यभरात संतापाची लाट; १०० हून अधिक संघटना आंदोलनाच्या मैदानात
एसटी सवलतींसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करा! राज्यभरात संतापाची लाट; १०० हून अधिक संघटना आंदोलनाच्या मैदानात

महाराष्ट्र दि २२ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. या सक्तीमुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असून, सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्या अटी लादण्याऐवजी कार्डची सक्तीच रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक सामाजिक संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह एकूण ३१ प्रवर्गांतील प्रवाशांना तिकीट दरात विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, कार्ड नसल्यास प्रवाशांकडून पूर्ण तिकीट दर आकारला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नियमितपणे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

कार्ड नोंदणीसाठी प्रवाशांचे हेलपाटे; शुल्क आकारणीवरही प्रश्नचिन्ह

एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, नोंदणीतील तांत्रिक अडथळे, रिचार्ज केल्यानंतरही खात्यात पैसे जमा न होणे, तसेच नोंदणीसाठी वारंवार बसस्थानकांवर जावे लागणे, अशा समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच कार्ड नोंदणीच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींमुळे या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

महिलांच्या नोंदणीचे प्रमाण केवळ ४३ टक्के असल्याचा दावा

राज्यभरात एनसीएमसी कार्ड नोंदणीची प्रक्रिया अपेक्षित गतीने होत नसल्याचे चित्र आहे. महिलांच्या कार्ड नोंदणीचे प्रमाण आतापर्यंत केवळ ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. यावरून मोठ्या संख्येने महिला अद्याप या प्रक्रियेपासून दूर असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत कार्ड अनिवार्य केल्यास सवलतीच्या प्रवासापासून अनेक प्रवाशांना वंचित राहावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

'कार्डच नको'; राज्यभर सह्यांची मोहीम

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेसह १०० हून अधिक सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये सह्यांची मोहीम राबवून प्रवाशांचा विरोध नोंदवला जात आहे. हजारो महिलांनी या कार्डच्या सक्तीला विरोध दर्शवत 'कार्डच नको' अशी भूमिका घेतल्याचे संघटनांनी सांगितले आहे.

एसटीचा प्रवास हा ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा सार्वजनिक वाहतुकीचा आधार आहे. त्यामुळे सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र कार्डची सक्ती करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे सुलभ पद्धतीने सवलत मिळावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

शासन आणि एसटी महामंडळाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन एनसीएमसी कार्डची सक्ती रद्द करावी, नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात आणि सर्व पात्र प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना सवलतीचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी राज्यभरातील आंदोलनकर्त्या संघटनांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित