एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ! ‘स्मार्ट कार्ड’द्वारे सवलतींचा लाभ अनिवार्य
✍️ महाराष्ट्र वाणी
मुंबई दि १२ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांसाठी एक ऐतिहासिक आणि डिजिटल क्रांती घडवणारा निर्णय घेतला आहे. पारंपरिक रोख व्यवहारांना पर्याय देत, अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या नव्या योजनेनुसार, पुढील काळात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, पत्रकार तसेच विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
महामंडळाने या प्रकल्पासाठी मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
एस.टी.च्या या निर्णयामुळे तिकीटासाठी रांगा, सुट्ट्या पैशांची चिंता आणि रोख व्यवहारांचा त्रास आता संपणार आहे. एका स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.
कार्डची महत्त्वाची वैशिष्ट्ये
✅ कार्ड किंमत :
नवीन कार्ड – ₹199 (GST सह)
जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास – ₹149
✅ वॉलेट मर्यादा :
किमान ₹100 पासून रिचार्ज
₹50 च्या पटीत रिचार्ज करता येणार
✅ रिचार्ज सुविधा :
ईटीआयएम मशीन
अधिकृत वेबसाईट
मोबाईल अॅप
नियुक्त एजंटकडून रिचार्ज
✅ नोंदणीसाठी व्यापक व्यवस्था :
ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.
बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
डिजिटल एस.टी.चा नवा अध्याय सुरू!
एस.टी. महामंडळाचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल युगात घेऊन जाणारा मोठा टप्पा ठरणार आहे.
✨ प्रवास आता केवळ बसने नाही, तर स्मार्ट कार्डच्या स्पर्शानेही पुढे जाणार आहे!