एसआयआर प्रक्रियेत उर्दू भाषिक मदतनीस नेमा; राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इरफान शेख अफसर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एसआयआर प्रक्रियेत उर्दू भाषिक मदतनीस नेमा; राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इरफान शेख अफसर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- मतदार यादीच्या एसआयआर (SIR) प्रक्रियेत उर्दू भाषिक मतदारांची नावे अचूकपणे नोंदविण्यासाठी बीएलओ व त्यांच्या पथकासोबत अतिरिक्त उर्दू भाषिक कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इरफान शेख अफसर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उर्दू भाषिक मतदार आहेत. मुस्लिम समाजातील अनेक मतदारांची नावे उर्दू भाषेतील असल्याने त्यांच्या नावांचा अचूक उच्चार व स्पेलिंग करण्यासाठी उर्दू भाषेचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. अन्यथा नावांच्या नोंदणीदरम्यान चुका होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांसोबत एक अतिरिक्त उर्दू भाषिक कर्मचारी नियुक्त करावा, जेणेकरून बीएलओ आणि त्यांच्या पथकाला आवश्यक सहकार्य मिळेल व मतदार यादीतील नोंदी अधिक अचूकपणे करता येतील, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सरकारी कार्यालयांमध्येही नियमित कर्मचाऱ्यांसोबत अतिरिक्त उर्दू भाषिक कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. यासाठी शहरातील उर्दू शाळा व महाविद्यालयांमधील उपलब्ध कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार प्रतिनियुक्ती करता येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तागडे पाटील, शहराध्यक्ष खाजा शरफोदीन, मुश्ताक भाई, इलियास किरमानी, रिजवान पटेल, इलियास पटेल, मुस्तफा पटेल लायकोदीन यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित