एसआयआरमध्ये नाव गायब झाले तरी घाबरू नका! पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार; निवडणूक आयोगाचे मोठे स्पष्टीकरण

नमुना क्रमांक ६ द्वारे नव्याने अर्ज करण्याची संधी; आधी नाव असतानाही अर्ज केल्यास खोटी घोषणा ठरणार नाही, कायदेशीर कारवाईही नाही

एसआयआरमध्ये नाव गायब झाले तरी घाबरू नका! पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार; निवडणूक आयोगाचे मोठे स्पष्टीकरण
एसआयआरमध्ये नाव गायब झाले तरी घाबरू नका! पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार; निवडणूक आयोगाचे मोठे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत पूर्वी नाव असतानाही आता नाव गायब झालेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अशा पात्र नागरिकांना पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ (Form 6) द्वारे नव्याने अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मतदार यादीत नाव असतानाही नव्याने अर्ज केल्यामुळे संबंधित मतदाराने खोटी घोषणा केली, असे मानले जाणार नाही. तसेच, या कारणास्तव मतदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नमुना क्रमांक ६ मुळे मतदारांमध्ये संभ्रम

नमुना क्रमांक ६ भरताना अर्जदाराला पहिल्यांदाच मतदार यादीत नाव समाविष्ट होत असल्याबाबत घोषणा करावी लागते. त्यामुळे यापूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या; मात्र एसआयआरनंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या नागरिकांसमोर अडचण निर्माण झाली होती. पुन्हा अर्ज केल्यास आपण चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे मानले जाईल का, अशी भीती अनेक मतदारांमध्ये होती.

या संभ्रमाची दखल घेत भारत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पूर्वी मतदार यादीत नाव असले तरी सध्याच्या प्रारूप यादीत नाव नसल्यास संबंधित पात्र नागरिक नमुना क्रमांक ६ भरून पुन्हा नाव नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. अशा अर्जाला खोटी घोषणा समजले जाणार नाही आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाणार नाही.

मात्र, एका महत्त्वाच्या अटीचे पालन आवश्यक

नव्याने अर्ज करणाऱ्या नागरिकाचे नाव महाराष्ट्रातील किंवा देशातील अन्य कोणत्याही राज्याच्या सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट नसणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाच नमुना क्रमांक ६ द्वारे नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.

त्यामुळे प्रारूप मतदार यादीत आपले नाव नसल्याचे आढळून आलेल्या पात्र नागरिकांनी संभ्रमात न राहता निर्धारित प्रक्रियेनुसार नमुना क्रमांक ६ भरून अर्ज करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित